यावल शहरातील अतिक्रमण हटविण्यास दोन महिन्यांची मुदत द्या
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण धारकांना दिलासा देण्याची सर्वपक्षीय मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
यावल : यावल शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सध्या दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी जोरदार मागणी अतिक्रमण धारकां सह शहरातील नागरिक, नगराध्यक्ष, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार, यावल पोलीस ठाणे तसेच प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
येत्या काळात पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी असे महत्त्वाचे सण-उत्सव सलग येत आहेत. अनेक अतिक्रमण धारकांचे छोटे-मोठे व्यवसाय आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याच दुकानांवर अवलंबून आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात अतिक्रमण हटविण्याची कारवाई झाल्यास अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याने किमान दोन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अतिक्रमण धारकांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, दोन महिन्यांची मुदत दिल्यास त्यानंतर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज भासणार नाही; आम्ही स्वतःच्या खर्चाने स्वतःचे अतिक्रमण काढून घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून तातडीची कारवाई काही काळ पुढे ढकलावी, अशी मागणी जोर धरत आहे.
विशेष म्हणजे, या मागणीसाठी सर्वपक्षीय स्तरावरून आवाज उठविला जात असून नागरिकां मध्येही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि इतर राजकीय घटकांतील कार्यकर्त्यांनीही संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दोन महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली आहे.
“आमच्या मुला-बाळांची दिवाळी गोड होऊ द्या; दोन महिन्यांनंतर अतिक्रमण हटविण्यास आमची कोणतीही हरकत नाही,” अशी भावनिक भूमिका अतिक्रमण धारकांनी मांडली आहे.
दरम्यान, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे; मात्र सणासुदीच्या काळात गोरगरीब व्यावसायिकांवर अचानक कारवाई न करता त्यांना दोन महिन्यांची संधी द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
आता प्रांताधिकारी प्रशासन या सर्वपक्षीय आणि नागरिकांच्या मागणीवर कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष लागले आहे.








