अवैध जळाऊ लाकूड वाहतूक करणारे पीकअप वाहन वनविभागाच्या ताब्यात
६ घनमीटर लाकूड व वाहनासह सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी
यावल, दि. ८ सप्टेंबर २०२६ : गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने वड्रिधरण ते वड्री रस्त्यावर गस्तीदरम्यान अवैध लाकूड वाहतूक करणारे संशयित पीकअप वाहन पकडले. या कारवाईत वाहनासह अंदाजे ६ घनमीटर आडजात जळाऊ लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविभागाचे राऊंड स्टाफ हरिपुरा व जामण्या परिसरात गस्त घालत असताना वड्रिधरण ते वड्री रस्त्यावर MH-19-S-4696 क्रमांकाचे पीकअप वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी वाहन चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालक वाहन जागेवरच सोडून पसार झाला.
यानंतर वनविभागाच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ६ घनमीटर आडजात जळाऊ लाकूड आढळून आले. सदर वाहन व लाकूड असा एकूण रु. ३,६०,००८/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून पावतीद्वारे मु.वि. केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला.
या प्रकरणी हरिपुरा पूर्व वनपरिक्षेत्राने प्र.री.क्र. ०५/२०२६, दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास वनपाल हरिपुरा एस. बी. इंडे करीत आहेत.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई श्री. सौरिष सहाय, उप वनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव; श्री. एस. ए. पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, यावल प्रादेशिक व कॅम्पा; तसेच वनक्षेत्रपाल पी. डी. जोशी, यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत डी. ए. परदेशी, वनपाल जामण्या; श्रीमती एस. एस. भोंगरे, वनरक्षक हरिपुरा पूर्व; श्रीमती एस. पी. भालेराव, वनरक्षक हरिपुरा; एस. बी. पाटणे, वनरक्षक; दीपक चव्हाण, वनरक्षक; राजेश बरेला, वनरक्षक; राजू तडवी, वनसेवक आणि शकील तडवी, वनसेवक यांनी सहभाग घेतला.
वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वनसंपदेचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाकडून गस्त व कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.








