ज्येष्ठ रयत सेवक प्रल्हाद गणपत ढोके यांचे निधन
राहुरी : अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त शिक्षक, निष्ठावान रयत सेवक, प्रखर पुरोगामी विचारवंत तथा रयत सेवक मित्रमंडळाचे आघाडीचे कार्यकर्ते प्रल्हाद गणपत ढोके (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्य-कर्तृत्वावर अपार श्रद्धा असलेले ढोके हे रयत शिक्षण संस्थेच्या विचारांशी आयुष्यभर निष्ठेने जोडलेले होते. त्यांनी रयत सेवक को-ऑप. बँक लि., सातारा येथे माजी व्हाईस चेअरमन म्हणून तसेच अहिल्यानगर जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे माजी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. रयत सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ढोके सरांनी शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक व संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनाने रयत परिवार, शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांचे ते वडील होत.
ढोके सरांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, रयत सेवक व मित्रपरिवाराने शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.








