परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भरत पांढरे यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
१९ जणांवर गुन्हा, ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बीड प्रतिनिधी: कुलदीप गायकवाड
बीड, दि. ९ :- नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतील मांजरसुंबा येथील विराज बियर बार च्या वरच्या मजल्यावर असलेल्या ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ येथे जुगार खेळत असलेल्या १९ जणांवर कारवाई करीत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने कारवाईचा धडका सुरू केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपनीय माहितीच्या आधारे नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतील मांजरसुंबा येथील विराज बियर बार च्या वरच्या मजल्यावर असलेल्या ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळास शासनाकडून परवाना दिलेला असून परवान्यातील अटींनुसार तिथे कोणत्याही स्वरूपाचा जुगार खेळण्यास मनाई असताना सदर ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईदरम्यान निदर्शनास आले.
क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे व उपस्थितीच्या नोंदी आढळून आल्या. तसेच उपस्थित इसमांच्या अंगझडतीमध्ये रोख रक्कम ५५,६०० रुपये, मोबाईल फोन, वाहने व इतर असा एकूण ७२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाईत विलास ज्ञानोबा नाईकवाडे, राम बरीकराव बहिरवाळ, अशोक भालचंद्र वेदपाठक, राहुल सुखाहरी गदळे, उत्तरेश्वर किसन खिंडकर, शेख अशोक शेख रफीक, सज्जाद खान, शफीक खान पठाण, राजेंद्र नारायण जाधव, भरत बलभीमराव काळुंके, संतोष जालिंदर चादर, मेघराज योगीराज ढोकणे, महादेव नारायण शिंदे, कानिफनाथ गणेश हुंबे, शेख समी शेख नईम, संदीप पिलाजी गोरे, निजामुद्दीन बक्षुद्दीन शेख, शकिलभाई युनुसभाई वोहरा, विष्णू अर्जुन निमुडे व संदीप छत्रभुज खोटे अशा एकूण १९ जणांविरूद्द कारवाई करण्यात आली आहे.
परवान्यातील अटींचे उल्लंघन करून जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम २२३ अन्वये नेकनूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक, नवनीत कावंत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. बीड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.








