शाळेची इमारत असूनही शिक्षक नाही; कोसा आलेंगा तील विद्यार्थ्यांची जंगलातून पायपीट
शिक्षक उपलब्ध करून शाळा तात्काळ सुरू करण्याची भाकपाची मागणी
चुन्नीलाल मोटघरे ( गडचिरोली ) एटापल्ली : दिनांक ९ सप्टेंबर २०२६ : ग्रामपंचायत कोहका अंतर्गत कोसा आलेंगा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत उपलब्ध असतानाही शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद आहे. त्यामुळे गावातील लहान वयाच्या अंदाजे तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोहका येथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागत असून, त्यांना दररोज सुमारे २ ते ३ किलोमीटर जंगलातील पायवाटेने पायी प्रवास करावा लागत आहे.
कोसा आलेंगा गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना भेडसावत असलेली ही समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गावकऱ्यांनी समस्या सांगितल्यानंतर भाकपा च्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली..
यावेळी भाकपा चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गावात शाळेची इमारत उपलब्ध आहे, विद्यार्थी उपलब्ध आहेत; मात्र केवळ शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद ठेवली जात आहे. गावकऱ्यांनी ही समस्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे हा प्रश्न मांडला आहे. दुर्गम भागातील लहान विद्यार्थ्यांना दररोज २ ते ३ किलोमीटर जंगलातील पायवाटेने दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि त्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. प्रशासनाने तात्काळ शिक्षक उपलब्ध करून कोसा आलेंगा येथील शाळा सुरू करावी.
या मागणीवर तात्काळ कार्यवाही करून शाळा सुरू न केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती एटापल्लीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी हा प्रश्न प्रशासनाकडे सातत्याने लावून धरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे निवेदन भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी कोसा आलेंगा गावातील नागरिक उपस्थित होते.








