साळवा फाट्यावर विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा बस थांबल्या नाहीत तर रास्ता रोकोचा इशारा
श्री. निलेश सोनवणे
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)
धरणगाव : साळवा फाटा येथे एस.टी. बसेस थांबत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शने केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून साळवा फाटा येथे एस.टी. बसेस थांबत नसल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साळवा, साकरे, निशाणे व गोंदेगाव येथील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षण तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी चोपडा येथे दररोज प्रवास करतात. मात्र, बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असून त्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत आहे.
बससेवेअभावी विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यातून वेळ व आर्थिक खर्च वाढत असल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
याबाबत संबंधित एस.टी. प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, साळवा फाटा येथे नियमितपणे एस.टी. बसेस थांबविण्याची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल घेऊन बससेवा पूर्ववत न केल्यास विद्यार्थी व शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात पालकांसह अर्चिता पाटील, दीक्षा भिल, दुर्गेश्वरी पाटील, धनश्री पाटील, दिव्या पाटील, हर्षदा पाटील, गौरव पाटील, हेमेश पाटील, कपिल पाटील, गौरव पारधी, कीर्तन गुजर, निखिल पाटील, हितेश कुंभार, नरेंद्र कुंभार, प्रेमचंद अत्तरदे, दीपक पाटील, नरेंद्र पाटील, विनोद पाटील, अनिकेत पाटील, भावेश पाटील, ज्ञानेश्वर सोनार आदी विद्यार्थी उपस्थित होते.








