ग्रामविकास अधिकाऱ्यावर हल्ला; अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोहरद ग्रामपंचायतीतील घटनेचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी ( बशिर तडवी )
दिनांक १० सप्टेंबर २६ : मोहरद, ता. चोपडा, जि. जळगाव : ग्रामपंचायत मोहरद येथे शासकीय आदेशानुसार अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकारी कुंदन कुमावत व ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मालकीच्या हँडपंपाच्या जागेसंदर्भातील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी विस्तार अधिकारी कुंदन कुमावत व ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण हे मोहरद येथे गेले होते. पाहणीदरम्यान रुस्तुम इस्माईल व आसिफ रुस्तुम यांनी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या घटनेमुळे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेचा मोहरद ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत असून, या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासाचे केंद्र असून, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात काम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासाचे केंद्र आहे; दहशत आणि हिंसाचाराचे ठिकाण नाही,” अशी भूमिका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण होईल अशी कठोर कारवाई प्रशासनाने करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.








