*भामरागड नगरपंचायत सफाई कामगारांणी पुकारला बेमुदत संप*
*दि.१० सप्टेंबर पासून बंद- भारतीय कम्युनिस्ट पार्टी*
चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली
भामरागड : सफाई कामगारांच्या ई.पी.एफ. प्रश्न प्रलंबित ठेवणे आणि मासिक वेतन वेळेवर न देण्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी व सफाई कामगार युनियनच्या वतीने दि. १० सप्टेंबर २०२६ पासून भामरागड नगरपंचायतीचे सफाई काम बेमुदत बंद करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने नगरपंचायतीला निवेदन देऊन सफाई कामगारांच्या ईपीएफ चा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. त्यातच मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या हक्कांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाकपा ने केला आहे. कामगारांच्या श्रमाचा मोबदला आणि सामाजिक सुरक्षा हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणे ही प्रशासनाची गंभीर अपयशाची बाब असल्याचे भाकपा ने म्हटले आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले “सफाई कामगारांच्या श्रमावर शहराची स्वच्छता व्यवस्था उभी आहे. मात्र, त्यांनाच वेळेवर वेतन आणि ईपीएफ मिळत नसेल तर हा कामगारांवरील अन्याय आहे. दि.२६ मे रोजी निवेदन देऊनही प्रशासनाने प्रश्न सोडवला नाही. त्यामुळे कामगारांना बेमुदत काम बंद पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलातून कायदेशीर प्रक्रियेनुसार कामगारांचे थकीत वेतन आणि ईपीएफ ची रक्कम सुरक्षित करून ती संबंधित कामगारांना देण्यात यावी. प्रत्येक कामगाराच्या ईपीएफ खात्याचा स्पष्ट हिशेब प्रशासनाने द्यावा. कामगारांच्या हक्काची रक्कम कोणत्याही परिस्थितीत दडपून ठेवू दिली जाणार नाही. कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. प्रशासनाने तातडीने चर्चा करून प्रश्न निकाली काढावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट केले.
भाकपा ने नगरपंचायतीकडे कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, ईपीएफ ची रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा करावी, ईपीएफ खात्यांची तपासणी करून संपूर्ण तपशील उपलब्ध करून द्यावा. आणि यापुढे प्रत्येक महिन्याचे वेतन वेळेवर मिळेल याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
आजच्या काम बंद आंदोलनावेळी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ.सचिन मोतकुलवार , जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जककुलवार, कॉ. दिनेश अरकी, कॉ. बाळू उईके, कॉ. समय येमुलवार तसेच सफाई कामगार युनियनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








