*शिक्षण सेवक पद रद्द करा; नवनियुक्त शिक्षकांना पहिल्या दिवसापासून नियमित वेतन द्या!* – आजाद समाज पार्टीचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन
चुन्नीलाल मोटघरे
गडचिरोली
महाराष्ट्रातील शिक्षण सेवक पदाची तीन वर्षांची मानधनाधारित व्यवस्था रद्द करून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नियमित वेतनश्रेणी व सर्व सेवा-सुविधा लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षक होण्यासाठी D.Ed./B.Ed. अभ्यासक्रमासोबत TET, TAIT व शासनाच्या निवड प्रक्रियेतून पात्र ठरावे लागते. एवढी कठीण प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती झाल्यानंतरही तीन वर्षे अत्यल्प मानधनावर सेवा घेणे हे नवनियुक्त शिक्षकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शिक्षण सेवक पदाची व्यवस्था रद्द करून नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नियमित वेतनश्रेणी व सेवा-सुविधा लागू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
विशेष म्हणजे केंद्रीय शिक्षक भरती मध्ये अशाप्रकारे शिक्षणसेवक पदावर नियुक्ती होत नाही व नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा त्या संदर्भात नमूद नाही.
______________________
महाराष्ट्रात 30000 शिक्षकांची भरती केल्याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. परंतु 30000 शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने त्यांना समान काम समान वेतन कायद्यानुसार त्यांना सन्मान द्यावा. अन्यथा ते जर सरकारवर नाराज झाली तर आगामी निवडणुकामध्ये त्याचा फटका सरकारला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे याचा विचार सरकारने केलाच पाहिजे
– राज बन्सोड
________________________
यासोबतच नवनियुक्त शिक्षकांना आपापसात बदली करण्याची मुभा, पती-पत्नी एकत्रीकरणाचा निर्णय तात्काळ लागू करणे तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना संस्थेत रुजू करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा संघटक हंसराज उराडे उपस्थित होते.
———————————–
शिक्षणमंत्री भुसे यांनी या संदर्भात आधीच राज्य स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असून ही बाब पुढच्या होणाऱ्या धोरणत्मक बैठकीत सुद्धा मांडणार असल्याचे सांगितले.
————————————-
शिक्षकांच्या या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नवनियुक्त शिक्षकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आजाद समाज पार्टीने व्यक्त केली आहे.








