यवत पोलीस स्टेशन हद्दीतील. गर्भलिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पत्नीस अटक. ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी.
(आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड तालुका यवत पोलीस ठाणे विशेष तपास पथकाची (एस आय टी) बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नी राणी अण्णा गिरी यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी (पी सी आर) सुनावली आहे. तसेच पाहिजे असलेला आरोपी डॉ.मंदार माळी याच्या अटकपूर्व जामिनासह ३ मुख्य आरोपींचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली
यवत / बारामतीः यवत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६६/२०२६,भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ८८,९१, ३(५) व इतर संबंधित कलमांन्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाद्वारे (एस आय टी) अत्यंत सखोल व तांत्रिक पद्धतीने सुरू आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी अण्णा गिरी याच्या राहत्या घरी त्याच्या उपस्थितीत बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्याच्या कृत्यात त्याची पत्नी नामे राणी अण्णा गिरी हिचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानातून येणारी रक्कम ही तिचे वैयक्तिक बँक खात्यावर घेतली जात असल्याचे व इतर आरोपींच्या बँक खात्यावरूनही गुन्ह्यातील रक्कम हस्तांतरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर निष्पन्न पुराव्यांच्या आधारे आरोपी राणी अण्णा गिरी हिला दिनांक ०८/०९/२०२६ रोजी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने आरोपी राणी गिरी हिला दिनांक ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पी सी आर) सुनावली असुन आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेः
सदर गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी नामे १) डॉ. सुमंत तुकाराम शितोळे, २) बापूराव जांभळे, ३) सचिन कदम यांनी माननीय सत्र न्यायालय, बारामती (पुणे) येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध निष्पन्न झालेले सबळ पुरावे व तांत्रिक पुरावे भक्कमपणे मांडले. न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवाद व पुराव्यांचे गांभीर्य विचारात घेऊन माननीय सत्र न्यायालय, बारामती यांनी सर्व आरोपितांचे जामीन अर्ज आज रोजी फेटाळून (नामंजूर) लावले आहेत.
तसेच, सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी डॉ. मंदार सुरेश माळी याने अटकेपासून वाचण्यासाठी माननीय सत्र न्यायालय, बारामती येथे दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज देखील माननीय न्यायालयाने या पूर्वीच फेटाळून नामंजूर केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील सखोल व विधिग्राह्य तपास विशेष तपास पथकाकडून.(एस आय टी) सुरू आहे. (संतोष तासगावकर) पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे तपासी अधिकारी, विशेष तपास पथक (एस आय टी), पुणे ग्रामीण.








