जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे; उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे
जिल्हा प्रतिनिधी उज्वल जैस्वाल
बुलढाणा, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बुधवार, ९ सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर घाटाखालील नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे गोविंद मिरगे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदासाठी गोविंद मिरगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे दोन्ही पदांच्या निवडी अविरोध घोषित करण्यात आल्या. डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षपदी आणि गोविंद मिरगे यांच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे घाटावरील आणि घाटाखालील नेतृत्वाला समान प्रतिनिधित्व मिळाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या नेतृत्वात प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न या निवडीमधून झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळविला होता. या दणदणीत विजयामुळे अध्यक्षपदाची धुरा पुन्हा डॉ. शिंगणे यांच्याकडे जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. बुधवारच्या अविरोध निवडीने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संचालक मंडळावरील मजबूत पकड आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर डॉ. शिंगणे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेच्या कारभाराला कोणती दिशा मिळते, याकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवड जाहीर होताच डॉ. शिंगणे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सोशल मीडियावरही अभिनंदनाच्या पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला असून, ‘किंग इज बॅक’ अशा आशयाच्या पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या आहेत.








