*बुलढाणा जिल्ह्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपये मदत द्या; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी*
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग अत्यंत भीषण संकटात सापडला आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, कपाशी, तूर व इतर सर्वच मुख्य पिके डोळ्यांसमोर वाळून गेली आहेत. महागडे बियाणे आणि खते वापरून दुबार-तिबार पेरणीचा प्रचंड आर्थिक भार सहन केल्यानंतरही हाती काहीही उरलेले नाही. या संकटामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांच्या चार्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.संपूर्ण बुलढाणा जिल्हा अधिकृतपणे ‘कोरडा दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात यावा. केवळ कागदी घोडे न नाचवता वाळलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ५०,००० रुपये सरसकट आर्थिक भरपाई देण्यात यावी. पीक विमा कंपन्यांना तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करण्याचे कडक निर्देश देऊन ‘मिड-सीझन ॲडव्हर्सिटी’ नियमांतर्गत ५० टक्के आगाऊ विमा भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज प्रचंड निराशेत असून त्याला तातडीने शासकीय आधाराची गरज आहे. प्रशासनाने वरील सर्व मागण्यांचा सहानभूतीने विचार करून तात्काळ ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, बुलढाणा उप तालुकाध्यक्ष अविनाश सुरडकर, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे, विभाग अध्यक्ष सागर इंगळे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








