देवळाली प्रवराच्या प्रश्नांसाठी आ. तनपुरेंची नगरसेवकां सोबत बैठक;
नगरसेविका पल्लवी ढूस यांची तीन निवेदनांद्वारे मागणी
देवळाली प्रवरा, दि. १२ सप्टेंबर २०२६ ( हिना उबाळे )
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांसोबत बैठक घेतली.
या बैठकीस नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार तनपुरे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेविका *पल्लवी वैभव ढूस* यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब ढूस यांनी आमदार तनपुरे यांना तीन स्वतंत्र निवेदनं सादर केली.
*निवेदनातील प्रमुख मागण्या अशा :*
*१. IWBP सॉफ्टवेअर दुरुस्तीचा प्रश्न :*
नगरपरिषदेच्या IWBP पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. करनिर्धारण करताना थकबाकी नसलेल्या नागरिकांनाही थकबाकी दाखवली जात असून पुनर्मूल्यांकनाच्या बिलांमध्ये चुकीची रक्कम येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नगरपरिषदेने अनेक वेळा शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच नगरपरिषदांच्या अडचणी लक्षात घेऊन IWBP प्रणालीत तातडीने सुधारणा करावी किंवा स्थानिक पातळीवर नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
*२. मुसळवाडी तलावासाठी भंडारदरा धरणातून पाणी आरक्षण :*
पूर्वी भंडारदरा धरणाच्या देवळाली प्रवरातून जाणाऱ्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलाव भरण्यासाठी पाणी आरक्षण होते. ते आरक्षण हटवून मुळा धरणावर वर्ग केल्याने हा कालवा महिनोन्महिने बंद राहिला असून देवळाली प्रवरा व लाभक्षेत्रातील गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुसळवाडी तलावाचे भंडारदरा धरणावरील आरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
*३. निळवंडे कालव्यातून गवळी माळ व गावतळी भरण्याची मागणी :*
निळवंडे धरणाच्या कालव्याचे पाणी देवळाली प्रवरा शहराच्या पश्चिम बांधापर्यंत पोहोचले आहे. या पाण्यातून शहराच्या पश्चिम भागातील गवळी माळ व इतर सर्व गावतळी भरण्यासाठी निळवंडे धरणावर आरक्षण टाकणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरणाचे सुमारे १७ TMC पाणी जायकवाडीला मिळणार असल्याने भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडीला द्यावे लागणारे पाणी वाचणार आहे. या वाचणाऱ्या पाण्याबाबत शासन स्तरावर धोरण ठरविण्याचे काम सुरू असून, या धोरणात देवळाली प्रवरातील सर्व गावतळ्यांचा समावेश करून ती निळवंडे कालव्याद्वारे भरण्यात यावीत, जेणेकरून शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.
देवळाली प्रवरा शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या तिन्ही मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.








