गणेशोत्सवासाठी रायपूर पोलिसांचा चोख नियोजनावर भर, गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
सागर इंगळे | रायपूर प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन रायपूर येथे शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील तसेच रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक पूर्वपरवानगी घेऊनच मंडळाची स्थापना करावी, तसेच मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेची संबंधित नागरिक, संस्था अथवा ग्रामपंचायतीची NOC/परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र व अधिकृत वीजमीटर घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी, घोषणा अथवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये, तसेच शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करून ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. मिरवणूक निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीतील वाहन चालकाकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना असावा, चालक कोणत्याही प्रकारच्या नशेच्या अंमलाखाली नसावा तसेच वाहनाची RTO तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनस्थळी अपघात टाळण्यासाठी विहीर, तलाव, धरण आदी ठिकाणी पुरेशा संख्येने स्वयंसेवकांची नियुक्ती करून ‘जलदूत’ म्हणून जबाबदारी सोपविण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांना ‘शांतिदूत’ म्हणून भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जनस्थळी विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये, तसेच पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी पोलीस प्रशासनाने गणेश मंडळे, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील व नागरिक यांच्या सहकार्याने गणेशोत्सव शांतता, सलोखा व बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके यांनी केले.








