किनवट तालुक्यातील निचपूरच्या सरपंच कोमलताई तिळेवाड अपात्र जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
किनवट ता .प्रतिनिधी | मार्कंडेय सिरमवार
किनवट : ग्रामसभा व मासिक सभांचे नियम व कायदे न पाळल्याप्रकरणी किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कोमलताई संतोष तिळेवाड यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,
किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी पि. उरकांडे यांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि बेकायदेशीर कार्यवाही विरोधात आवाज उठवीत 2022 ते 2025 दरम्यान ग्रामसभा किंवा मासिक सभा घेतली नसल्याने विद्यमान सरपंच कोमल तळेवाड यांची उचल बांगडी करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दाखल केली होती यांच्या वतीने ॲड. एन.जे. काकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाद अर्ज दाखल केला होता.
प्रतिवादी सरपंच कोमलताई संतोष तिळेवाड यांनी 7ऑक्टोबर 2022 रोजी सूत्रे स्वीकारल्यापासून 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 7 नुसार अनिवार्य ग्रामसभा व कलम 36 नुसार मासिक सभा आयोजित न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी कायदेशीर नोटीस बजावून दोन्ही बाजूंच्या सुनावण्या घेण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे
वादी उपसरपंच यांच्यावतीने दाखल करण्यात आलेला वाद अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.कोमलताई संतोष तिळेवाड यांना निचपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरील उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.सदर आदेश सर्व संबंधितांना कळवून संचिका अभिलेख कक्षात वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हा अंतिम निकाल नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी 7 सप्टेंबर 2026 रोजी पारित केला आहे. प्रकरणामुळे ग्रामपंचायत निसपुरमध्ये अंतर्गत वाद सुरू असून गावाचा विकास मात्र यामुळे खुंटला असल्याचे बोलल्या जात आहे याबाबत सरपंच कोमल तिळेवड यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तर उपसरपंच बालाजी उरकांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे








