भुसावळ परिसरात पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
चक्रधर महाले /भुसावळ प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून परिसरात जोरदार हजेरी लावली.पावसाने पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेले कोरड्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीची चिंता आता मिटल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जुलै अखेर पासून पावसाने मोठा खंड दिल्याने भुसावळ परिसरातील कापूस मका सोयाबीन उडीद,मूग,ज्वारी, इत्यादी खरीप पिके करपू लागली होती. जमिनीतील ओलावा संपल्याने जवळजवळ पिके पिवळी पडून माना टाकत होती दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर घोंगावत होते आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची चिंता वाढली होती. अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षानंतर शुक्रवार सकाळपासून भुसावळ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. संततधार बरसल्याने शेत शिवार जलमय झाल्याने या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. कोमेजून गेलेल्या पिकांमध्ये पुन्हा टवटवी आली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे उशिरा का होईना पाऊस आल्याने आता खरीप हंगामाच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.








