राष्ट्रीय लोक अदालतीत ४३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा; किनवट न्यायालयात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
किनवट प्रतिनिधी // मार्कंडेय सिरामवार
किनवट:
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयीन प्रकरणांसह नगर परिषद व बँकेची अशी एकूण ४३ प्रकरणांचा तडजोडीने यशस्वी निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादांवर पडदा पडला असून नागरिकांचे वेळ व पैशांची मोठी बचत झाली आहे.
दिवाणी न्यायाधीश मा. पी. एम. माने साहेब व सह दिवाणी न्यायाधीश मा. के. जी. मेंढे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पॅनेल सदस्य म्हणून ॲड. इंदूरवार यांनी काम पाहिले.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ॲड. पंजाबराव गावंडे, ॲड. दिलीप काळे, ॲड. तौफिक कुरेशी, ॲड. राहुल सोनकांबळे, ॲड. आकाश कोमरवार, ॲड. मिनहाज बडगुजर आणि ॲड. संकेत राठोड यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी, वकील वर्ग, बँक अधिकारी व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, किनवट नगर परिषद कार्यालयाशी संबंधित कर व इतर बाबी, तसेच बँकांची थकबाकी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना समोरासमोर बसवून आपापसातील गैरसमज दूर करत ४३ प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला. लोकअदालतीच्या या यशस्वी आयोजनाबद्दल पक्षकार व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








