भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आयोजन
महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतील हजारो साधकांचा सहभाग संत-महंतांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभणार.
विशेष प्रतिनिधी // मनोज बिरादार
‘आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, नांदेड’ यांच्या वतीने मागील नऊ वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी साखळी पारायण सोहळ्याचे आयोजन यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी मारताळा येथील मामा मंगल कार्यालय येथे हा आध्यात्मिक व भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो ज्ञानेश्वरी साधक, वारकरी, भाविक तसेच संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानेश्वरीच्या सामूहिक पारायणातून समाजात अध्यात्म, संस्कार, भक्ती आणि एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अवघ्या ४२ साधकांपासून सुरू झालेला हा ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रवास आज हजारोंच्या संख्येपर्यंत पोहोचला असून, यंदा जवळपास १२,५६० साधक सहभागी होत आहेत. त्यामुळे यंदाचा सोहळा विशेष भव्य आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
नऊ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
- ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या वाढत्या प्रतिसादाचा आलेख अत्यंत प्रेरणादायी आहे. या वाढत्या सहभागातून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने वारकरी संप्रदायामध्ये निर्माण केलेले आध्यात्मिक आकर्षण आणि संस्थेच्या कार्याला मिळणारा व्यापक प्रतिसाद अधोरेखित होतो.
महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतील साधकांचा सहभाग
चालू वर्षी महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमधून ज्ञानेश्वरी साधक या पारायण सोहळ्यात सहभागी होत आहेत. गावागावांतून आणि विविध जिल्ह्यांतून साधक मंडळी ज्ञानेश्वरीचे पारायण करीत असून, त्याचा सामूहिक भक्तीमय समारोप मारतळा येथे होणार आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी व ज्ञानेश्वरीप्रेमी भाविकांना जोडणारा आध्यात्मिक उपक्रम ठरला आहे.
शोभायात्रेने होणार कार्यक्रमाचा शुभारंभ
दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता वैकुंठवासी मामासाहेब मारतळेकर यांच्या समाधीस्थळापासून मामा मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत नियोजित धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम पार पडतील.
सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत साखळी पारायण, सामूहिक पारायण, आरती व पसायदान होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपस्थित साधुसंतांचे मनोगत, मार्गदर्शन व आशीर्वाद लाभणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पाडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
संत-महंतांचे विशेष मार्गदर्शन
या भव्य सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागांतील संत-महंतांची विशेष उपस्थिती लाभणार आहे श्री सदगुर नराशाम महाराज येवती,नारायण महाराज, जीवनदास महाराज, यदुबन महाराज, देवगिरी महाराज, प्रयागिरीजी महाराज, ब्रह्मानंद महाराज आणि मधुसूदन महाराज यांची उपस्थिती व मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे.
तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, व्यंकटराव पाटील कपाटे, दत्तराम पाटील एडके, रामजी पाटील शिंदे, रामराव पाटील माने, ह. भ. प. राम महाराज पांगरेकर (संस्थापक अध्यक्ष, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था), व्यंकटराव महाराज जाधव, प्रभाकर महाराज पुयड, शिवाजी महाराज मदमवाड, गुलाबराव पाटील उबाळे, प्रवीण महाराज रोतुलवाड, हरिनाम पाटील कदम, बंडू पाटील कदम, त्रिमुख पाटील एडके, भगवान पाटील राहटीकर, पंढरीनाथ महाराज, जगन्नाथ सावकार चक्रवार, शिवाजी पांगरेकर, बालाजी पाटील शिंदे, गोविंदराव इबितदार, नंदकिशोर पांचाळ (लातूर), आकाश महाराज खोकले (परभणी जिल्हाध्यक्ष), उत्तमराव मल्हारे (छत्रपती संभाजीनगर), चंपतराव डाकोरे (राज्य प्रसिद्धी प्रमुख), गणेश पवार, माधव पाटील शिंदे, सतीश चितळकर, निरंजन पाटील कौडगावकर, अनिताताई पतंगे आणि कुसुमताई शिंदे यांच्यासह संस्थेतील मार्गदर्शक, सल्लागार, राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच परिवारातील सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सुमारे पंधरा हजार वारकरी-भाविकांची उपस्थिती अपेक्षित
यंदाच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास जवळपास पंधरा हजार वारकरी व भाविकांची उपस्थिती राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वरीच्या सामूहिक पठणाने, संतांच्या विचारांनी आणि हरिनामाच्या गजराने मारतळा परिसर भक्तिमय होणार आहे.
ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नसून तो जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारा आध्यात्मिक दीपस्तंभ आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा आणि अध्यात्मिक संदेशाचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
‘एक दिवस काम बाजूला ठेवून सोहळ्याचा साक्षीदार व्हा’
या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला सर्व ज्ञानेश्वरी साधक, वारकरी बांधव, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“आपल्या दैनंदिन जीवनातील एक दिवस बाजूला ठेवून या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या भक्तिमय सोहळ्याचा साक्षीदार व्हावे. संत-महंतांचे विचार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन ज्ञानेश्वरीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरीचा विचार आणि संतांचा आशीर्वाद’ या त्रिवेणी संगमातून मारतळा येथे यंदाचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अविस्मरणीय ठरणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले.








