आकाश पाळण्यात महिलेच्या केसांसह चामडी निघाली
तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक दुर्घटना
किनवट प्रतिनिधी | मार्कंडेय सिरमवार
किनवट : महागांव तालुक्यातिल फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी
तांन्हा पोळ्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते विशेषतः
महिला वर्गाची यात्रेत मोठी गर्दी होती. मात्र, गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आकाश पाळण्यात घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेने यात्रेच्या आनंदावर विरजण पडले. फुलसावंगी येथील बाली मारोती
टाळीकोटे (वय २५) ही महिला आकाश पाळण्यात बसली असताना अचानक तिचे केस पाळण्याच्या पाळणा
बेरिंगमध्ये अडकले. सुरू असल्याने काही क्षणांतच केस ओढले गेल्याने त्यांच्या डोक्यावरील केसांसह चामडी निघाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली. घटना घडताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे व जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबविला. जखमी महिलेला त्वरित बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.








