माहूरला कारवाई मग किनवट मध्ये काय चाललंय ? सर्वोच्च न्यायालय व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला किनवट प्रशासनाकडून थेट आव्हान …
- किनवट प्रतिनिधी ( मार्कंडेय सिरामवार)
दिनांक १६ सप्टेंबर २०२६ : नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 अ लगतची अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. किनवटपासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेल्या माहूर तीर्थक्षेत्रात प्रशासनाने तातडीने रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला. याउलट, किनवट शहरात प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमणे जैसे थे असून, त्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे.
आयएएस संवर्गातील साहाय्यक जिल्हाधिकारी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत असूनही मूग गिळून गप्प आहेत.
सविस्तर वृत्त
माननीय सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश आणि नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या स्पष्ट सूचनांना किनवट शहरात अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्याभरात राष्ट्रीय महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम वेगात सुरू असताना, किनवट नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक महसूल विभागाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि आश्चर्यकारक ठरत आहे.
किनवटपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पवित्र माहूर तीर्थक्षेत्रामध्ये प्रशासनाने तातडीने कारवाई करत रस्ते आणि नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, याच धर्तीवर किनवट शहरात कारवाई होणे अपेक्षित असताना, येथील प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसत आहे.
किनवट शहरात रस्त्यांच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे, अनधिकृत टीन शेड, आणि सर्रास उभी केली जाणारी मोठमोठे वाहने यामुळे मुख्य रस्ते अक्षरशः गलिच्छ आणि अरुंद झाले आहेत.रस्त्यावरील दुकानांनी आणि टपऱ्यांनी नाल्या गिळंकृत केल्यामुळे पावसाळ्यात किंवा सांडपाण्याच्या पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे.
पादचाऱ्यांसाठी फुटपाथ म्हणजे काय, हे किनवटवासीयांना जणू माहीतच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नागरिक आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे.
विशेष म्हणजे, किनवट येथे भारतीय प्रशासनिक सेवेतील सक्षम अधिकारी साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतानाही, त्यांच्या अधिकार क्षेत्रात हा नियमभंग उघडपणे सुरू आहे. प्रशासनाची ही नरमाईची भूमिका पाहता, “प्रशासन स्वतःच अतिक्रमणांना राजाश्रय देत आहे का?” असा संतप्त सवाल सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला थेट आव्हान देत किनवट मध्ये अतिक्रमणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आता या जळजळीत वास्तवानंतर नांदेड जिल्ह्याचे उच्च अधिकारी किनवट प्रशासनाला जाब विचारणार का, आणि कधी धावणार बुलडोझर? याकडे संपूर्ण किनवटवासीयांचे डोळे लागले आहेत.








