जलजीवन योजनेचा बोजवारा ; येडूर खुर्द मध्ये गढूळ पाणी..
कोट्यवधींचा निधी खर्चूनही पाणीप्रश्न कायम ; सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ.
देगलूर तालुका प्रतिनिधी | संघपाल मदने
देगलूर तालुक्यातील येडूर खुर्द येथील जलजीवन योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही गावातील पाणीप्रश्न सुटलेला नसून, सणासुदीच्या काळात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने महिला व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जलजीवन योजनेतून अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बोअरच्या माध्यमातून नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून या नळाला गढूळ पाणी येत आहे. नागरिकांनी याबाबत ग्रामसेवक पांढरे यांना माहिती दिली असता “लवकरच व्यवस्था करू” असे सांगण्यात आले. मात्र दिवस उलटूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गावातील मूलभूत सुविधांकडे सरपंच व ग्रामसेवक यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात नाली बांधकामाचा अभाव, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अंगणवाडी व प्राथमिक शाळेला मिळालेला वित्त आयोगाचा निधीही अपेक्षित पद्धतीने वापरला जात नसल्याची तक्रार आहे.
ग्रामसेवक नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या ऐकून घेणारे प्रशासनच गावात दिसत नसल्याचा आरोप आहे. मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीला मिळालेल्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर, झालेली कामे व खर्च यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी गावकरी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे.
सीमावर्ती भागातील या गावाच्या समस्यांकडे वरिष्ठ अधिकारीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. गढूळ पाणीपुरवठा तात्काळ बंद करून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.








