ठाणेदार निलेश सोलंकी यांच्या हस्ते महाआरती
उज्वल जैस्वाल | रायपूर
रायपूर : ढोल-ताशांचा गजर, गणरायाच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि आकर्षक सजावटीने उजळून निघालेला चौक अशा भक्तिमय वातावरणात रायपूरमध्ये ‘चौकातला राजा’ गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जय महाकाल मित्र मंडळाने उभारलेल्या गणरायाच्या आकर्षक देखाव्यामुळे परिसरातील नागरिक व भाविकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल सायंकाळी ८ वाजता रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोलंकी यांच्या हस्ते ‘चौकातला राजा’ची आरती संपन्न झाली. आरतीच्या वेळी गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष उज्वल जैस्वाल आणि उपाध्यक्ष अमित सातव यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य ऋषी मुरडकर, दिपक सिरसाट, ओम खंडागळे, करण सिरसाट, तुषार धांडगे, कार्तिक भोसले, अनिकेत मुरडकर,विशाल गिरी,गौरव सिरसात, शुभम भोसले,पार्थ जयस्वाल, ओम् जयस्वाल, गणेश हणवते व
गावातील बरेच युवक यांच्यासह कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी!
केवळ गणेशाची प्रतिष्ठापना आणि आरतीपुरता उत्सव मर्यादित न ठेवता, धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न जय महाकाल मित्र मंडळाकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यातून समाजोपयोगी संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण आणि मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे ‘चौकातला राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रायपूरच्या चौकात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.








