डीजे च्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रणाची मागणी
ज्येष्ठ नागरिकांचे प्रशासनाला निवेदन
मिलिंद इंगळे | जिल्हा प्रतिनिधी अकोला
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधन, जनजागृती आणि वैचारिक चळवळीचे माध्यम बनविले. मात्र, सध्याच्या काळात उत्सवाचे स्वरूप बदलत असून कर्णकर्कश डीजे, ध्वनिप्रदूषण आणि अनावश्यक शक्तिप्रदर्शनामुळे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाला बाधा येत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली.
डीजेच्या वाढत्या आवाजा.विरोधात भूमिका मांडताना डॉ. श्रीकांत तिडके यांनी धर्माच्या नावावर समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या बाबींचे समर्थन न करता माणुसकी, संयम आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवात नृत्य व मोठ्या आवाजातील डीजे ऐवजी व्याख्याने, वक्तृत्व, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांना चालना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी संकटाकडे लक्ष वेधत डॉ. तिडके यांनी, “शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना उत्सवाच्या आवाजात ते प्रश्न दडपले जाऊ नयेत,” असे सांगत सामाजिक प्रश्नांवरही जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. प्रशासनाने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, शिक्षक व प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संदीप कुमार आपार यांना निवेदन देऊन डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. निवेदनाची प्रत शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांना देण्यात आली.
यावेळी कवी माधव काळे,रतनलाल महाजन, डॉ. तुषार भास्कर, प्रा. अविनाश बेलाडकर, श्रीकृष्ण बोळे, राजूभाऊ वानखडे, सुरेश जोगळे, अरविंद तायडे, गावंडे, मिलिंद अवचित इंगळे, सुनिल वानखडे, विलास सावळे, कल्पक कांबळे, विजय इंगळे, गजानन तायडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.








