शेतात ड्रिप बसवण्यावरून वाद महिलेचा विनयभंग…
पतीला लाकडी दांड्याने व लोखंडी पक्कडीने मारहाण केल्याची फिर्याद; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
दिनेश गायकवाड | राहुरी
राहुरी : वाघाचा आखाडा येथे शेतात उसाच्या पिकासाठी ड्रिप बसविण्याच्या कामावरून झालेल्या वादातून महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेला वाचविण्यासाठी आलेल्या तिच्या पतीसही लाकडी दांडा आणि लोखंडी पक्कडीने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 अंतर्गत कलम 74, 118(1), 115(2), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ४० वर्षीय महिलेनी १० सप्टेंबर रोजी पोलिसांत लेखी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वाघाचा आखाडा येथे गट क्रमांक 644/4/ब मध्ये त्यांच्या आईकडून मिळालेली 46 गुंठे शेतजमीन आहे. या जमिनीबाबत त्यांचे चुलते तुकाराम भिमराज तनपुरे यांच्यासोबत 2023 पासून राहुरी न्यायालयात दिवाणी स्वरूपाचा वाद सुरू आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजता पीडित महिला व त्यांचे पती हे उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी ड्रिप बसविण्याचे काम करण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी तुकाराम तनपुरे व संगिता तनपुरे हे तेथे आले. शेतजमिनीच्या मालकीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
फिर्यादीच्या आरोपानुसार, वाद वाढल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली आणि संगिता तनपुरे यांनी फोन करून गौरव तनपुरे यांना बोलावले. त्यानंतर तुकाराम तनपुरे व इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुकाराम तनपुरे यांनी खाली पाडून अंगावर बसत ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, पत्नीला सोडविण्यासाठी आलेल्या पीडित महिलेच्या पतीला लाकडी दांडा व लोखंडी पक्कडीने डोके, खांदा, पाठ व मानेवर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच गौरव तनपुरे यांनी पुन्हा येथे कसे येता तेच बघतो, अशी धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तुकाराम भिमराज तनपुरे, संगिता तुकाराम तनपुरे, गौरव तुकाराम तनपुरे आणि नितीन तुकाराम तनपुरे (सर्व रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फिर्यादी पीडित महिला या कायदेशीर रित्या वारसदार आहेत मात्र त्यांचे बंधू पाराजी मंजाबापू तनपुरे यांना मृत्यूपूर्वी दारू पाजून बळजबरीने मृत्युपत्र चुलते तुकाराम भिमराज तनपुरे यांनी तयार करून घेतल्यामुळे यासंदर्भातील न्यायालयात दिवाणी खटला दाखल असून याच कारणामुळे प्रकरण घडल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.








