सृष्टीचे शिल्पकार भगवान विश्वकर्माचे पूजन व जयंती उत्साहात साजरी
मार्कंडेय सिरामवार | किनवट ता. प्रतिनिधी
किनवट : ब्रह्मांडाचे आद्य रचनाकार, शिल्पशास्त्र व वास्तुकलेचे दैवत भगवान श्री विश्वकर्मा यांचा प्रकट दिन तथा जयंती किनवट शहरासह देशभरात गुरुवारी (१७ सप्टेंबर) उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कन्या संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर विविध ठिकाणी सकाळपासून भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. कारागीर, कामगार, तंत्रज्ञ, इंजिनिअर्स, फर्निचर व्यावसायिक तसेच विविध व्यावसायिकांनी या उत्सवात सहभाग घेतला.
या निमित्ताने यंत्रसामग्री, हत्यारे, कॉम्प्युटर, वाहने आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची स्वच्छता करून त्यांना फुलांचे हार अर्पण करण्यात आले. कुंकवाचा टिळा लावून विधिवत पूजा करण्यात आली. अनेक ठिकाणी भजन, महाआरती, अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
रमेश टॉकीज कॉर्नर व बालाजी चौकात पूजन
किनवट शहरातील रमेश टॉकीज कॉर्नर व बालाजी चौक येथे विश्वकर्मा समाजाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. किनवट नगराध्यक्षा सुजाताताई ऐनडरलवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे गटनेते श्रीनिवास नेमानेवार, नगरसेवक सुरज सातूरवार, प्रवीण राठोड, प्रशांत कोरडे, प्रभू कोल्हे यांच्यासह संतोष येलचरवार, प्रमोद श्रीपादवार, रामूलु मामा गणोजीवार, किशन मामा कोत्तापल्लीवार, राजू उठलावार, शुभम गणोजीवार तसेच विश्वकर्मा समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समाजाच्या वतीने अन्नदान करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ‘ॐ विश्वकर्मणे नमः’ या मंत्राच्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने व्यवसाय व उद्योगात भरभराट व्हावी, कामगारांचे संरक्षण व्हावे आणि देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. पूजन व महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








