ओझोनचे कवच, पृथ्वीचे संरक्षण
परशुराम नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांची नाटिकेतून पर्यावरण जनजागृती
बाळापूर | प्रतिनिधी
ओझोन थराचे महत्त्व, त्याचे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या संरक्षणातील योगदान तसेच वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथील वर्ग सातच्या विद्यार्थ्यांनी ‘ओझोनचे कवच, पृथ्वीचे संरक्षण’ या विषयावर प्रभावी विज्ञान नाटिका सादर केली.
ओझोन थर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र प्रदूषणामुळे ओझोन थरावर होणारे परिणाम पर्यावरणासाठी चिंतेचा विषय आहेत. या वैज्ञानिक संकल्पनेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या छोटेखानी, रंजक आणि संदेशपूर्ण नाटिकेतून अत्यंत प्रभावीपणे मांडले. पर्यावरणाचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देण्याचा संदेश या नाटिकेतून देण्यात आला.
सदर नाटिका विद्यालयाचे विज्ञान शिक्षक विजय पजई यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. आनंदी खिरडेकर, तनया सोळंके, आरुषी गवई, ईश्वरी बाभूळकर, स्वरा आगरकर, निशा गवळी, पूर्वा पोफळे आणि स्वरा उगले या विद्यार्थिनींनी विविध भूमिका साकारत नाटिका प्रभावीपणे सादर केली.
विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा उपयोग केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरणविषयक सामाजिक जनजागृतीसाठी केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष किरण भाऊ नाईक, दीपक भाऊ नाईक, उपाध्यक्ष प्रथमेश नाईक, तसेच एन. एस. गमे सर, के. एम. जोशी सर, एस. एस. बोरगावकर सर आणि शामभाऊ देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षक पजई यांचे अभिनंदन केले.
या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य मनोज आगरकर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच उपमुख्याध्यापक एस. एच. भदे सर आणि पर्यवेक्षक प्रा रमेश भड सर यांचे सहकार्य मिळाले.








