घुंगराळ्याच्या विकासासाठी मोहन तुरटवाड यांचा पुढाकार पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पंकजाताई मुंडेंकडे साकडे
२० ते २५ गावांतील पशुपालकांच्या सुविधेसाठी महत्त्वाची मागणी; खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पशुवैद्यकीय सेवेची गरज
विशेष प्रतिनिधी | मनोज बिरादार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा कोळी महासंघाचे नायगाव तालुकाध्यक्ष मोहन आत्माराम तुरटवाड यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घुंगराळा येथे नियमित आठवडी बाजार भरत असून परिसरातील जवळपास २० ते २५ गावांतील शेतकरी व शेतमजूर या बाजारासाठी येतात. या भागातील अनेक कुटुंबे शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन करतात. जनावर आजारी पडल्यास उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी पशुधन घेऊन जावे लागते. त्यामुळे पशुपालकांना मोठी गैरसोय तसेच आर्थिक खर्च सहन करावा लागतो.
घुंगराळा येथील जागृत देवस्थान खंडोबा महाराजांची यात्राही मोठ्या प्रमाणात भरते. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या यात्रेला मराठवाड्यातील विविध भागांतून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात पशुधनाची आवक होत असून भव्य पशुप्रदर्शनाचेही आयोजन केले जाते. त्यामुळे या परिसरात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा
घुंगराळा गाव व परिसराच्या विकासासाठी मोहन आत्माराम तुरटवाड विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, तसेच गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन व संबंधित विभागांकडे विविध मागण्या मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी हीदेखील गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घुंगराळा हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू झाल्यास घुंगराळ्यासह आसपासच्या २० ते २५ गावांतील शेतकरी व पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे. पशुधनाला वेळेवर उपचार मिळाल्यास पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन घुंगराळा येथे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी मोहन आत्माराम तुरटवाड यांनी केली आहे. तसेच यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती त्यांनी पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली आहे.








