बौद्ध पुरातत्त्वीय वारशाच्या संरक्षणासाठी २२ सप्टेंबरला देशभर धरणे-रॅली
अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन व प्रदर्शन
दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासह विविध मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने राष्ट्रव्यापी आंदोलन
चंदन जंजाळ | प्रतिनिधी
अकोला : बौद्ध पुरातत्त्वीय वारशाचे संरक्षण तसेच दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासह विविध मागण्यांसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने देशव्यापी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम यांच्या आवाहनानुसार या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.आंदोलन चार टप्प्यांत राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात १७ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, राज्यपाल तसेच केंद्रीय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांवर संविधानाच्या चौकटीत राहून धरणे-प्रदर्शन करण्यात आले. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, राज्यपाल आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांना देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पत्रकात देण्यात आली आहे.
आता आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात २२ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा मुख्यालयांवर रॅली व प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्हा मुख्यालयावरही धरणे, रॅली व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेने पत्रकार परिषद द्वारे कळविले आहे.
आंदोलनाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे राष्ट्रीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध पुरातत्त्वीय वारशाचे संरक्षण, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन राबविण्यात येत असल्याचे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने म्हटले आहे. निर्धारित कार्यक्रमांमध्ये समर्थक तसेच संबंधित नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषद साठी ऍड डि टी जंजाळ, गजानन वाकोडे जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, देवेंद्र शिरसाठ जिल्हा संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, प्रशांत उपर्वट, देवानंद अवचार, डॉ अनंत शिरसाठ, सतिष अवचार, राहुल वाकोडे जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मार्चा अकोला चंदन जंजाळ प्रचारक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क अकोला उपस्थित होते.








