महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची माहूर तालुका कार्यकारिणी गठीत
विनोद जाधव यांची तालुकाध्यक्ष पदी, तर भीमाशंकर सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
अंबादास मुकटे | माहूर
माहूर : माहूर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा राज्य समन्वयक अमोल कोमावार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे मुख्य संपादक गोपाल गौरवाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ ही ग्रामीण पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेली संघटना असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले.
याच बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची माहूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष तथा राज्य समन्वयक अमोल कोमावार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे नवनियुक्त मराठवाडा-विदर्भ समन्वयक गोपाल गौरवाड यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार विनोद जाधव यांची तालुकाध्यक्षपदी, तर भीमाशंकर सूर्यवंशी यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेला अधिक सक्षम करण्यासोबतच जनसामान्यांच्या विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
माहूर तालुक्यात पत्रकारांच्या हितासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे आणि प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.








