वॉर्ड क्रमांक १३ मधील नैसर्गिक पाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी…
रस्त्यावर टाकलेले मातीचे ढिगारे हटविण्याबाबत नगरपंचायतीकडे निवेदन
अंबादास मुकटे | माहूर
माहूर : माहूर शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये डोंगरावरून नैसर्गिकरीत्या वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे तात्काळ हटवावेत, अशी मागणी वॉर्ड क्रमांक १३ मधील रहिवासी पवन अनंतसिंह चौहान यांनी माहूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वॉर्ड क्रमांक १३ मधील डोंगराचे नैसर्गिक पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गावर नगरपंचायतीमार्फत बंधारे टाकण्यात आले आहेत. मात्र, या बंधाऱ्यांसमोर तसेच रस्त्यालगत काही नागरिकांनी मातीचे मोठमोठे ढिगारे टाकल्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे.
पावसाचे पाणी योग्य मार्गाने वाहून न गेल्याने संबंधित ठिकाणी पाणी साचत असून, परिसरात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच मागील काळात या परिसरात मोठे अजगर आणि काही विषारी साप आढळल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या ठिकाणी साचणारे पाणी व अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुरळीत राहिल्यास परिसरातील पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने संबंधित ठिकाणी पाहणी करून रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे हटवावेत आणि नैसर्गिक पाण्याची वाहिनी मोकळी करून द्यावी, अशी मागणी निवेदक पवन अनंतसिंह चौहान यांनी केली आहे.
प्रतिनिधी : अंबादास मुकटे, माहूर








