किनवट राष्ट्रीय राजमार्ग १६१ (अ) सुरक्षे विना बनतोय मृत्यूचा सापळा..
मार्कंडेय सिरमवार | किनवट
किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 161 (अ) वरील अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या ना त्या कारणाने या महामार्गावर सतत छोटे-मोठे अपघात घडत असून, सुरक्षेच्या पुरेशा उपायाविना हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. याचाच प्रत्यय आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आला, जेव्हा दिवसाढवळ्या घडलेल्या एका अपघाताने नागरिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
या बाबद अधिक वृत्त असे की,
19 सप्टेंबर दुपारी किनवटकडे येत असलेली MH 12 KJ 6904 क्रमांकाची चारचाकी गाडी चालकाला रस्त्याचा नेमका अंदाज न आल्याने थेट दुभाजकामध्ये घुसली. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपघातामुळे मार्गावरील वाहनचालकांचे होश उडाले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, दुभाजकाच्या मध्ये लावण्यात आलेले बॅनर्स हे या अपघाताचे मुख्य कारण ठरले असावे. दुभाजकावरील या बेकायदेशीर किंवा अयोग्य फलकांमुळे चालकाला समोरचा रस्ता आणिळवळण समजले नाही, परिणामी गाडी थेट दुभाजकात जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला; परंतु यामुळे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्ट्रीट लाईट्स आणि योग्य सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चालकांचा सातत्याने गोंधळ उडत आहे.दुभाजकांवर किंवा रस्त्याच्या मध्यभागी लावले जाणारे बॅनर्स चालकांच्या दृष्टीस अडथळा ठरत असूनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील हे जीवघेणे खड्डे, चुकीची रचना आणि सुरक्षेच्या त्रुटी तातडीने दूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सुदैवाने आज जीवितहानी झाली नाही, पण प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल किनवटकर विचारत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन महामार्गावरील सुरक्षेचे उपाय त्वरित वाढवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.








