किनवट माहूरच्या दुष्काळावर आ. केराम आक्रमक…
“कागदी आकडे नकोत; शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळाची वस्तुस्थिती पाहा – आ. भीमराव केराम”
मार्कंडेय सिरमवार | किनवट
किनवट–माहूर तालुक्यातील शेतकरी पावसातील खंड, अपुरे पर्जन्यमान आणि चिंताजनक पीकस्थितीमुळे अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन किनवट–माहूरमध्ये तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी आ. भीमराव केराम यांनी केली.
दि. १९ सप्टेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आढावा बैठकीत आ. केराम यांनी किनवट–माहूरमधील वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडली. पावसातील दीर्घ खंड, अपुरा पाऊस, जमिनीतील कमी झालेला ओलावा, पिकांची खालावलेली अवस्था आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्याची परिस्थिती कागदावरील आकडेवारीतून नव्हे, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिसते. त्यामुळे केवळ कागदी अहवालांवर निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका आ. केराम यांनी मांडली.
पर्जन्यमानासोबतच पीकस्थिती, जमिनीतील ओलावा आणि पाणी उपलब्धतेचा स्वतंत्र आढावा घेऊन शासनाच्या दुष्काळ निकषांनुसार किनवट–माहूरला कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, पीक विमा, पाणी, चारा तसेच आवश्यक दुष्काळी सवलती तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही आ. केराम यांनी केली.
दरम्यान, राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
या आढावा बैठकीस संबंधित पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
किनवट–माहूरच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता विलंब न करता शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत उपलब्ध करून द्यावी, असा स्पष्ट आग्रह आ. भीमराव केराम यांनी बैठकीत धरला.








