२०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार..
‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या घोषणेने जनजागरण मोहीम;
२८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी
बातमी सम्राट | चंदन जंजाळ | अकोला बाळापूर | दि.२५/०९/२६/
अकोला : ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निर्णायक टप्प्यावर नेण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या घोषणे अंतर्गत विदर्भातील ११ जिल्हे व १२० तालुक्यांतील गावागावांत आणि शहरा शहरांत जनजागरण करण्यासाठी ‘मिशन २०२७’ अंतर्गत जनसंकल्प मेळाव्यांची मालिका आयोजित करण्यात येत आहे.
२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारातील अटींची पूर्तता झाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. नागपूर करार कुचकामी ठरल्याचे सांगत २८ सप्टेंबर २०२६ रोजी विदर्भातील १२० तालुक्यांत ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या दिवशी शहीद-ए-आझम भगतसिंग यांना अभिवादन करून विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यां समोर नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमा पासून १०० बाईकची रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली काला नाका, आर्वी रोड येथील विदुला रुख्मिणी सभागृहा पर्यंत जाणार असून सकाळी ११ वाजता रॅलीला सुरुवात होईल. दुपारी १ वाजता रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.
तसेच २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अकोला येथे प्रमिलाताई टोपले सभागृहात दुपारी १२ वाजता ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह पश्चिम विदर्भातील विदर्भवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा दाखला देत समितीने विदर्भाच्या विकासातील अनुशेषा.बाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. सिंचन, उद्योग, ऊर्जा, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, आदिवासी विकास, ग्रामविकास आणि सामाजिक न्याय यांसह विविध क्षेत्रांमध्ये विदर्भावर अन्याय झाल्याचा दावा समितीने केला आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्प, रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न, कुपोषण आणि नक्षलवादासारख्या सामाजिक-आर्थिक समस्यांवर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच उपाय असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
‘ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज्य चाहिए’ या भूमिकेतून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी निकाली काढण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागरण सुरू ठेवणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत अध्यक्ष माजी आमदार ऍड.. वामनराव चटप,उपाध्यक्ष ऍड.सुरेश वानखेडे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद तायडे, धनंजय मिश्रा,सुरेश जोगळे, डॉ. पी. आर. राजपूत, अकोला जिल्हाध्यक्ष गजाननराव भटकर, गजानन आमदाबादकर, सतीश देशमुख, शंकरराव केवर,महिला महानगर अध्यक्षा सुनीता कौस्कार, जिल्हाध्यक्षा मीनाताई कवडे आदींची उपस्थिती होती.








