माळी घोगरगाव येथील ख्रिस्ती धर्माविषयी बदनामी.कारक वक्तव्याचा निषेध..
सकल ख्रिस्ती समाज व परिवर्तनवादी संघटनांचे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
बातमी सम्राट | दिनेश गायकवाड | प्रतिनिधी.| दि.२५/०९/२६/
वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव येथे धर्मांतराच्या आरोपावरून काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान ख्रिस्ती धर्म, धर्मगुरू तसेच धार्मिक व्यक्तींविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्यांचा सकल ख्रिस्ती समाज व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक चारुदत्ता खोंडे यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, माळी घोगरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांतराचा आरोप करून ख्रिस्ती धर्मगुरू व शैक्षणिक संस्थेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील काही वक्त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरू, संस्था, प्रभू येशू, पवित्र मरिया व संत मदर तेरेसा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
तसेच, शिक्षण संस्थेतील मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी तसेच संस्थाचालकाविरोधात सूड उगविण्याच्या उद्देशाने धर्मपरिवर्तनाचा आरोप करण्यात आल्याचा दावा एका शिक्षकाने केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली.
अल्पसंख्याक समाजाविषयी अशा प्रकारची वक्तव्ये किंवा घटना घडू नयेत, तसेच सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अनिल भोसले, प्रवीणराजे शिंदे, पी. एस. निकम, दीपक कदम, राजेंद्र भोसले, पास्टर आण्णासाहेब अमोलिक, सुरेश ठुबे, डॉ. सुधीर ब्राम्हणे, निशिकांत पंडित, सतीश पाटोळे, बाळासाहेब भोसले, पॉल बनकर, सुनील वाघमारे, इग्नाती रूपटक्के, सुरेश अमोलिक, पास्टर राजेश कर्डक, रविंद्र गायकवाड, विजय बोर्डे आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.








