सुजात आंबेडकर यांच्या लढ्याला ! दलित पँथर चा जाहीर पाठिंबा..
बातमी सम्राट | दिनेश गायकवाड | राहुरी | दि.२५/०९/२६/
हरेगाव: ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या प्रश्नावर आता गप्प बसायचे नाही, तर न्यायहक्का साठी ठामपणे आवाज उठवायचा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी हरेगाव येथे झालेल्या सभेत मांडली. ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांवर संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांच्या या भूमिकेला दलित पँथरचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव यांनी ठोस आणि जाहीर पाठिंबा देत, या लढ्यात दलित पँथर खांद्याला खांदा लावून उभी राहील, असे स्पष्ट केले.
राजूभाऊ आढाव यांचा स्पष्ट इशारा अन्याय सहन केला जाणार नाही! ख्रिस्ती समाजाच्या न्यायहक्काच्या प्रश्नावर सुजात आंबेडकर घेत असलेल्या भूमिकेचे समर्थन करत आढाव यांनी सुजात आंबेडकर यांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला. समाजाच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक संविधानिक लढ्याला दलित पँथरची साथ राहील, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आढाव यांच्या या भूमिकेमुळे हरेगावच्या सभेत ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नाला संघटनात्मक पाठबळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हरेगाव, ता. श्रीरामपूर येथे झालेल्या सभेत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव, जिल्हा उपाध्यक्ष भानुदास जाधव, तालुका सरचिटणीस विशाल खरात, राहुरी तालुका उपाध्यक्ष चंपालाल पाटोळे, सुरेश वाकडे, निमंत्रक नंदू साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ख्रिस्ती समाजाच्या न्यायहक्काचा प्रश्न केवळ निवेदनांपुरता मर्यादित न ठेवता, तो संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पुढे नेण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. सुजात आंबेडकर यांच्या भूमिकेला राजूभाऊ आढाव यांनी दिलेला हा जाहीर पाठिंबा हरेगावच्या सभेतील व अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेच्या चर्चेचा विषय ठरला.








