चारी नं. १६ मधील वाहत्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
टाकळीभान येथील ऋषीकेश कांबळे यांचा दुर्दैवी अंत; सकाळी आढळला मृतदेह
बातमी सम्राट | संदीप जाधव | टाकळी भान प्रतिनिधी | दि.२५/०९/२६/
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ऋषीकेश नामदेव कांबळे (वय ३०) या तरुणाचा चारी क्रमांक १६ मधील वाहत्या पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे टाकळीभान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश कांबळे हा बुधवारी (दि. २३) रात्री दुचाकीवरून जात असताना चारी क्रमांक १६ मधील पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भंडारदरा जलाशयातून चारी क्रमांक १६ द्वारे शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने चारीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी या रस्त्याने जात असताना त्याला चारीच्या पाण्यात मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ आसपासच्या शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी नागरिक व शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली.
पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने मृतदेह काही प्रमाणात पाण्याखाली होता. त्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र, घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर ऋषीकेश कांबळे यांची वस्ती असल्याने त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याचे वडील नामदेव कांबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह हा आपला मुलगा ऋषीकेश याचाच असल्याचे सांगितले.
दरम्यान, रात्री दुचाकीवरून जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने ऋषीकेश चारीच्या पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस मदतनीस बाबा सय्यद घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविला.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात ऋषीकेश कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऋषीकेश कांबळे हे गुर्हाळ व्यावसायिक नामदेव कांबळे यांचे पुत्र होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, चुलते, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








