सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्य दडलेय? निलंबन रद्द करा, त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा!
राहुरी प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
शिरसाट वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका श्रीमती सुलताना जावेद शेख यांच्या निलंबन प्रकरणाला आता सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने नवे वळण मिळाले आहे. आपल्यावरील निलंबनाचा आदेश रद्द करून संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, शासकीय कागदपत्रे आणि अन्य पुरावे तपासल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
शाळेतील कामकाजावरून संबंधित सहकारी शिक्षक दगडू कडूस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर आपल्याविरुद्ध कटकारस्थान करून खोट्या तक्रारी करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी आपल्याकडे केल्या होत्या. एका विद्यार्थिनीच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना घडली असून, या घटनेची नोंद शाळेतील सीसीटीव्हीमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शेख यांच्या तक्रारीनुसार, त्या किरकोळ रजेवर असताना २८ जुलै रोजी संबंधित शिक्षकाने शाळेच्या कार्यालयात प्रवेश करून त्यांच्या टेबलातील कपाटाच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर शासकीय कागदपत्रे ठेवलेले कपाट उघडून कागदपत्रांची उचकापाचक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
याच पार्श्वभूमीवर २९ जुलै रोजी शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बसविणाऱ्या व्यक्तीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून काही विशिष्ट फुटेज पाहणे, त्याची प्रत मिळविणे तसेच काही फुटेज नष्ट करण्याबाबत चर्चा झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही निवडक फुटेज व छायाचित्रे पालकांना पाठवून आपल्याविषयी गैरसमज निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेचा संकेतशब्द बदलण्यात आल्याने काही दिवस फुटेज पाहता आले नाही. त्यानंतर संकेतशब्द उपलब्ध झाल्यावर २७, २८ आणि २९ जुलैचे फुटेज तपासले असता काही भाग उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा शेख यांनी केला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेतील मूळ नोंदी, टाइम स्टॅम्प, संगणकीय लॉग आणि उपलब्ध फुटेजची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित शिक्षकाविरुद्ध तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गैरप्रकाराची चौकशी करण्याबाबत आपण १८ व २० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, असा दावा शेख यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी करूनही तत्काळ चौकशी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
१५ सप्टेंबर रोजी निलंबन आदेश देण्याच्या घटनेवरही शेख यांनी आक्षेप घेतला आहे. आदेश देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख स्पष्ट न झाल्याने आपण आदेश स्वीकारला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेबाबत वेगवेगळी माहिती समोर आली असून, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास नेमके काय घडले हे स्पष्ट होऊ शकते, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करताना आपण यापूर्वी सादर केलेल्या सीसीटीव्ही पुराव्यांची योग्य तपासणी करण्यात आली नाही, हा शेख यांचा मुख्य आक्षेप आहे. त्यामुळे केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई न करता उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे, शाळेतील नोंदी, विद्यार्थ्यांचे जबाब आणि संबंधित शिक्षकांची भूमिका यांची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेत प्रत्यक्ष छेडछाड झाली का? कोणते फुटेज उपलब्ध नाही? कागदपत्रांची उचकापाचक झाली का? विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना नेमकी काय आहे? तसेच आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींची वस्तुस्थिती काय आहे? या सर्व बाबींची त्रयस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.
आपण एकल महिला असून किशोरवयीन मुलगी तसेच वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी आपल्यावर असल्याचे नमूद करून निलंबन आदेश रद्द करावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत राहुरी तालुक्यातील अन्य शाळेत नियुक्ती द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र अधिकृत चौकशी होऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. उपलब्ध सर्व पुरावे सुरक्षित ठेवून निष्पक्ष चौकशी करावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी श्रीमती सुलताना जावेद शेख यांनी केली आहे.








