पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना SBI कडून १ कोटींची विमा मदत .
बातमी सम्राट | बशिर तडवी | जिल्हा प्रतिनिधी जळगांव | दि.२६/०९/२६/
सॅलरी पॅकेज अंतर्गत भरत कोळी यांच्या वारसांना धनादेश सुपूर्द
यावल : यावल पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी भरत विठ्ठल कोळी यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) यावल शाखेच्या वतीने पोलिस सॅलरी पॅकेजअंतर्गत १ कोटी रुपयांची विमा मदत देण्यात आली. कोळी यांचे वेतन खाते SBIच्या यावल शाखेत असल्याने त्यांना सॅलरी पॅकेजअंतर्गत असलेल्या विमा संरक्षणाचा लाभ मिळाला.
भरत कोळी हे अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरून जळगावहून यावलच्या दिशेने मोटारसायकलवरून येत असताना किनगाव ते यावलदरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.
कोळी यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वेतन खात्याला असलेल्या विमा संरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबीयांना विमा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार SBIच्या यावल शाखेच्या वतीने त्यांच्या वारसांना १ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
धनादेश वितरणप्रसंगी मयत पोलिस कर्मचारी भरत कोळी यांचे वडील विठ्ठल कोळी आणि पत्नी रितू कोळी उपस्थित होत्या. यावेळी SBI यावल शाखेचे व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे, तसेच केशव चौधरी, दिनेश खडसे, श्रेया नाथ यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व वासुदेव मराठे पोलिस हेन्स कॉन्स्टेबल यांचीही उपस्थिती होती.
भरत कोळी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. अशा परिस्थितीत पोलिस सॅलरी पॅकेज अंतर्गत मिळालेली १ कोटी रुपयांची विमा मदत कुटुंबीयांसाठी आर्थिक आधार ठरणार आहे. वेतन खात्याशी संबंधित विमा संरक्षणामुळे अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या या मदतीमुळे भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यास मोठी मदत होणार आहे.








