वृद्धाश्रमात रक्तरंजित थरार; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
त्रास देत असल्याच्या कारणावरून लोखंडी हत्याराने वृद्धांवर हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी: दिनेश गायकवाड
अहिल्यानगर शहरालगतच्या विळद घाट, निंबळक शिवारातील मातोश्री वृद्धाश्रमात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला. वृद्धाश्रमातील काही जण त्रास देत असल्याच्या कारणावरून एका ५४ वर्षीय व्यक्तीने लोखंडी हत्याराने वृद्धांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. कुंभारी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) हा मातोश्री वृद्धाश्रमात राहत होता. शनिवारी सकाळी सुमारे ६ वाजता वृद्धाश्रमातील काही व्यक्ती त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याने लोखंडी हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात दत्तात्रय शंकर हारके (वय ८०, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि मंगेलेश्वर बाबुराव हेणे (रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला.
या घटनेत संतोष भीमराव पिरंगळ (रा. नवी सांगवी, पुणे), गणेश छबू घोडके (रा. आंबेडकर बौद्ध नगर, मनमाड, जि. नाशिक), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय ७८, रा. गारखेडा, छत्रपती संभाजीनगर), निमराज दामोदर फिसके (वय ८०, रा. भिंगार), साहेबराव दगडू भवर (वय ८०, रा. निंबळक, ता. जि. अहिल्यानगर) आणि गोरक्ष हरिभाऊ फुंदे (वय ७४, रा. नारायण डोहो, अहिल्यानगर) हे सहा जण जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी राजू घुले यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
घटनेमुळे मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकारामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.








