राहुरी खुर्दमधील बालगोपाळांनी मुळा नदीतीरी विधिवत पूजा करून केले गणेश विसर्जन
राहुरी प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी शहरासह राहुरी तालुक्यातील विविध भागांमध्ये गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. अनेक गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाची मिरवणूक काढत भक्तिभावाने बाप्पांना निरोप दिला.

राहुरी खुर्द परिसरातही अनेक घरांमध्ये बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने गणरायाची स्थापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी या बालगोपाळांनी आपल्या कुटुंबीयांसह राहुरी येथील मुळा नदीतीर गाठले. यावेळी बालगोपाळांसह कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनीही विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.
मुळा नदीतीरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्यात आली. आरती करून नैवेद्य दाखवत कुटुंबीयांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर भक्तिभावाने गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी बालगोपाळांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि बाप्पांना निरोप देताना भावुक वातावरण पाहायला मिळाले.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. बालगोपाळांनी उत्साहाने साजरा केलेला हा गणेश विसर्जन सोहळा उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय ठरला. कुटुंबातील ज्येष्ठांनीही बालगोपाळांना गणेशोत्सवाच्या परंपरा आणि संस्कारांची जाणीव करून देत आनंदाने या सोहळ्यात सहभाग घेतला.








