लोटस स्कूलच्या आट्या-पाट्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी बाजी ..
अंडर-१४ गटात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश
बातमी सम्राट | मिलिंद इंगळे | जिल्हा प्रतिनिधी अकोला |दि.२६/०९/२६/
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोटस स्कूल, मूर्तिजापूरच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धेतील अंडर-१४ गटात लोटस स्कूलच्या संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे संघाची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक आट्या-पाट्या या देशी खेळात लोटस स्कूलच्या खेळाडूंनी वेग, चपळता, तंदुरुस्ती आणि अचूक रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. सामन्यांमध्ये जिद्द, संघभावना आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार अयुक्त शिंदे याने, तर उपकर्णधार राजवीर सरोदे याने केले. त्यांच्यासोबत ऋग्वेद हिरवे, रघुवीर देशमुख, जाहेद खान, मोहम्मद जहेद, गौरव आठवल, आतिफ खान, अवेज शाह, राजवीर हत्तीमारे, विराट आळेकर आणि साहिल तेलगोटे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या यशाबद्दल शाळेचे फाउंडर विक्रम शर्मा व को-फाउंडर रश्मी शर्मा यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे हे सातत्यपूर्ण यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य भावना मॅकवान यांनी नियमित सराव, शिस्त आणि खेळातील सातत्य यामुळे हे यश मिळाल्याचे सांगत आगामी विभागीय स्पर्धेतही संघ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
संघाचे क्रीडा प्रशिक्षक रोहन शेळके यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासोबतच खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर दिलेला विशेष भर या विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
लोटस स्कूलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, पालक तसेच मूर्तिजापूर शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांकडून विजयी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय विजयानंतर आता विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी लोटस स्कूलचा संघ सज्ज झाला आहे.








