मुखेडला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने युती शासनाचा जाहीर निषेध…
शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार माजी आमदार बेटमोगरेकर यांचा इशारा
बातमी सम्राट | मनोज बिरादार | मुखेड तालुका प्रतिनिधि |दि.२६/०९/२६/
शासनाकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा तीव्र निषेध करत,मुखेड तालुक्यातील हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल,असा इशारा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी दिला आहे.
मुखेड तालुका सध्या अत्यंत भीषण दुष्काळाच्या सावटाखाली होरपळत आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध स्तरावर निवेदने देऊन व आंदोलने करूनही शासन-प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.खरीप हंगाम २०२६ मधील शासन निर्णयानुसार ‘ट्रिगर १’ च्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून मुखेड तालुक्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.
शासनाने तात्काळ गांभीर्य दाखवून ‘ट्रिगर २’ च्या दुष्काळ यादीत मुखेड तालुक्याचा समावेश करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा,अशी मागणी माजी आमदार बेटमोगरेकर यांनी केली आहे.मुखेड तालुका त्वरित दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा,नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना १००% पीक विमा मंजूर करण्यात यावा,
गुराढोरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने तालुक्यात तातडीने चारा छावण्या उभारण्यात याव्यात,दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला तातडीने काम उपलब्ध करून द्यावे.
शासनाने आणि प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल,असा स्पष्ट इशाराही माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी दिला आहे.








