बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदे सह 10 जणांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल ..
बातमी सम्राट | रोहन सोनाळे | पुणे | दि.२७/०९/२६/
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय 65 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात बिग बॉस मराठी फेम रीलस्टार दिव्या शिंदे आणि तिचा साथीदार आण्णा उर्फ आप्पा ढमढेरे व इतर 8 ते 10 अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 351(2), 115(2), 324(4), 333 सह खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा थोडक्यात तपशील:
फिर्यादी डॉ. विद्याधर गायकवाड हे सन 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘कला आविष्कार महोत्सव’ कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम केल्याचे कारण सांगून आरोपी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रोड) हिने फिर्यादी यांच्याकडे 5,00,000/- रुपयांची खंडणीची मागणी केली.
दि. 17 सप्टेंबर रोजी आरोपी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे व इतर साथीदार फिर्यादी यांच्या घरी गेले असता फिर्यादी घरी नसल्याने त्यांच्या पत्नी व मुलास शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेले.
दि. 23 सप्टेंबर रोजी आरोपी आण्णा ढमढेरे याने फिर्यादी यांना फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा 5 लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास दोन दिवसात घरी माणसे पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे प्रवेश करून काठी, बेल्टने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले व त्यांची चारचाकी गाडी जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.








