२२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात रोजगार सहाय्यक आक्रमक…
शासन निर्णयाची होळी; २ ऑक्टोबरपर्यंत सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा !
बातमी सम्राट | अनिकेत विधाटे | म्हैसगांव प्रतिनिधी | दि.२८/०९/२६/
म्हैसगाव : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील जाचक अटींविरोधात ग्रामरोजगार सहाय्यकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सदरील शासन निर्णय तातडीने रद्द करून ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन निर्णय लागू करावा, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यकांनी मा तहसीलदार व मा गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या म्हणण्यानुसार, नव्या शासन निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या रोजगार सहाय्यकांच्या सेवेसमोर अनिश्चितता निर्माण झाली आहे. रोजगार सहाय्यकांची निवड केवळ एक वर्षासाठी करण्याची तरतूद, ६ हजार मनुष्यदिवसांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतरच मानधन मिळण्याची अट तसेच दोन महिने काम उपलब्ध नसल्यास केवळ २ हजार ५०० रुपये मानधन देण्याची तरतूद आदी बाबींमुळे रोजगार सहाय्यकांमध्ये नाराजी आहे.
तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यावर देण्याची तरतूद करण्यात आल्याने मानधनाच्या वितरणाबाबतही प्रश्न निर्माण होणार असल्याचे रोजगार सहाय्यकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून रोजगार सहाय्यकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या शासन निर्णयाचा निषेध म्हणून रोजगार सहाय्यकांनी शासन निर्णयाची होळी केली. तसेच २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शासन निर्णयामध्ये आवश्यक सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाने रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून २२ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द अथवा त्यातील जाचक अटींमध्ये सुधारणा करावी आणि ३ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय लागू करावा, अशी मागणी रोजगार सहाय्यकांकडून करण्यात आली आहे.यावेळी तहसीलदार राहुरी यांना व गट विकास अधिकारी राहुरी पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित ग्राम रोजगार सहाय्यक तालुका अध्यक्ष श्री गंगाधर कोबरने, उप अध्यक्ष संदीप जेऊ घाले, सचिव, जालिंदर रोडे, संघटक श्री बाळासाहेब जाधव, खजिनदार, कमलेश विधाते, राज्य कार्यकारी सदस्य श्री विलास गिरे, रखमा कोकाटे, शरद बागुल, पूजा संतोष झावरे, सोनाली भारत खाटेकर, भानुदास बेलकर, सोमनाथ भाऊसाहेब जाधव, पूजा सुनिल वाळके, सचिन तमणर, सरदार शेख, समर्थ नवले, आदी ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







