पुणे जिल्ह्यातील तांडा विकासाचा आढावा; ३३ तांड्यांच्या विविध प्रश्नांवर मुंबई येथील बैठकीत सविस्तर चर्चा..
बातमी सम्राट | कांताभाऊ राठोड | पुणे शहर प्रतिनिधी | दि.२८/०९/२६/
पुणे : संत सेवालाल महाराज बंजारा-लबाना तांडा समृद्धी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तांड्यांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. तांड्यांमधील मूलभूत सुविधा, प्रलंबित प्रशासकीय प्रश्न, निधी आणि विकासकामांना गती देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस योजनेचे समन्वयक डॉ. जगदीश सकवान, प्रशासकीय अधिकारी श्री. रविंद्र राठोड, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पानझाडे, तसेच श्री. निलेश जाधव आणि श्री. अक्षय राठोड उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय अशासकीय सदस्य ॲड. पंडित राठोड, जिल्हा अशासकीय सदस्य श्री.प्रेमकिसन राठोड, श्री. रमेश बद्रीनाथ राठोड, कविता आडे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेश राठोड, सविता पवार, श्री. स्वप्निल चव्हाण, श्री. राहुल चव्हाण, श्री. सुनील राठोड, श्री. रावसाहेब शंकर चव्हाण, डॉ. सुभाष राठोड, श्री. शिवराम जाधव, श्री. लक्ष्मण चव्हाण आणि श्री. राजू चव्हाण उपस्थित होते.
बैठकीत पुणे जिल्ह्यातील ३३ तांड्यांपैकी १८ तांड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी ७ तांड्यांना निधी मिळाल्याची माहिती मांडण्यात आली. उर्वरित तांड्यांच्या सर्वेक्षणासह विकासकामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील अनेक तांडे वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने विकासकामांसाठी आवश्यक प्रशासकीय परवानग्या व संबंधित विभागांमधील समन्वयाचा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला. अशा तांड्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज, स्मशानभूमी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
तांड्यांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच महिलांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार व लघुउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य सुविधांबाबतही तांडानिहाय आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच तांड्यांना महसुली दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. मंजूर निधीचा योग्य वापर, कामांची गुणवत्ता आणि तांडानिहाय विकासकामांचा नियमित आढावा घेण्यावरही भर देण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील तांड्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ तांड्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.








