मादी बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ..
बंदराचा पाठलाग करताना डीपीवर चढली; बंदराचाही मृत्यू
बातमी सम्राट | समीर बल्की | चिमूर तालुका प्रतिनिधी | दि.२८/०९/२६/
चिमूर : बंदराचा पाठलाग करताना विद्युत डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी शंकरपूर उपवनक्षेत्रातील वगळपेठ परिसरात घडली. या घटनेत बंदराचाही मृत्यू झाला.
पिपळगाव येथील शेतकरी महादेव धारणे यांच्या शेतातील विद्युत डीपीवर रविवारी सायंकाळी बंदर चढले होते. त्याचा पाठलाग करताना बिबट्याही डीपीवर चढली असावी. यावेळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दोन्ही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
सोमवारी सकाळी महादेव धारणे यांना डीपीजवळ बिबट्या व बंदर मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देसक्कर, मानद वन्यजीव रक्षक अमोल गोरकर, वनपाल राजेंद्र मेघाम व वनरक्षक कालिदास गायकवाड यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाने पंचनामा करून दोन्ही मृत प्राण्यांना खडसंगी येथील वनविभाग कार्यालयात आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या नियमानुसार बिबट्या व बंदराचे दहन करण्यात आले.
यावेळी ब्रह्मपुरी उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहाय्यक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. रमेश कुमार ओझाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








