आदिवासी समाजा विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध
सकल आदिवासी बांधवांची भव्य निषेध रॅली प्रविण जेठेवाड यांच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
किनवट प्रतिनिधी | मार्कंडेय सिरामवार | दि.२९/०९/२६/
किनवट, दि. २९ सप्टेंबर २०२६ : सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अपमानजनक व सामाजिक तेढ निर्माण होईल असा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून प्रविण नरसिंगराव जेठेवाड यांच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने किनवट येथे भव्य निषेध रॅली काढण्यात आली. आदिवासी समाजाचा अवमान करणाऱ्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस ठाणे किनवट येथे दाखल FIR क्र. ०२७९/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १९६(१), ३५२, ३५३(१) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. सदर मजकूर संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यातून सामाजिक तेढ व वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणात संबंधित व्हिडिओची निर्मिती, सोशल मीडिया खाते, प्रसारणाची तारीख, डिजिटल प्रसाराची व्याप्ती तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही वक्तव्याचा निषेध असून, कायद्याच्या चौकटीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल आदिवासी समाज बांधवांनी केली आहे.
“सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया मजकुराची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.







