चिखली बु.येथे अवैध सागवानावर वन विभागाचा दणका!
३४ नग सागवान लाकूड जप्त; कारवाईने लाकूड तस्करांमध्ये खळबळ
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट : अवैध वृक्षतोड व सागवान लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी वन विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, चिखली (बु.) येथे केलेल्या कारवाईने अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी कारवाई करत बेवारस स्थितीत ठेवलेला सागवान कटसाईजचा ३४ नगांचा साठा जप्त केला.
चिखली (बु.) परिसरात अवैध सागवान लाकूड लपवून ठेवल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता ०.२३१४ घनमीटर सागवान लाकूड आढळून आले. पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत ४ हजार ८८२ रुपये असल्याचे वन विभागाने नमूद केले आहे.
गुप्त माहिती मिळताच तातडीची कारवाई
वन विभागाच्या या कारवाईतून अवैध लाकूड साठवणूक आणि तस्करीविरोधात विभागाने सतर्कता वाढवल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, बेवारस अवस्थेत लाकूड सापडताच ते तातडीने जप्त करण्यात आल्याने अवैध साठेबाजांवर कायदेशीर कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे.
जप्त लाकूड नेमके कोणी साठवले, ते कुठून आणण्यात आले आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा वन विभागाकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
तस्करीविरोधात कारवाईचा धडाका
ही कारवाई नांदेडचे उपवनसंरक्षक संदिप चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक के. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) धीरज मदने, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एन. केंद्रे, चिखली वन परिमंडळाचे वनपाल बी. टी. जाधव, अंबाडी-किनवटच्या वनपाल मीरा टोम्पे, वनरक्षक एस. एम. यादव, रवि दांडेगावकर, ओम शिंदे, संघशीला काकडे तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवले व अनिल लाखाडे यांनी सहभाग घेतला.
वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध सागवान साठवणूक व तस्करी करणाऱ्यांवर आता विभागाची नजर असल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.








