कलाविष्कार व जनग्रामिण पत्रकार संघामार्फत रुग्णांना फळवाटप
(अवचित हमराजी इंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक उपक्रम; रुग्णालयातील सेवाभावी कर्मचाऱ्यांचेही मानले आभार)
मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी अकोला:- मुर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याच्या उद्देशाने कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मुर्तिजापूर तसेच जनग्रामिण पत्रकार संघ शाखा मुर्तिजापूर व अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अवचित इंगळे यांचे वडील अवचित हमराजी इंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालय परिसरातील समाजसेविका लक्ष्मीबाई देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. समाजसेवा, रुग्णसेवा आणि वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीला अभिवादन करून रुग्णसेवेचा हा उपक्रम राबविण्यात आला.
यानंतर रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. आजारपणाच्या काळात रुग्णांना औषधोपचारासोबतच मानसिक आधार, आपुलकी आणि माणुसकीची ऊब मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राज नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक संस्थांनी रुग्णालयातील रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही सकारात्मक बाब असल्याचे नमूद केले. समाजातील विविध घटकांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना आधार देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान अवचित हमराजी इंगळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. साधेपणा, माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबीयांमध्ये संस्कारांची जपणूक यांना महत्त्व देणाऱ्या त्यांच्या स्मृती जपण्यासाठी वाढदिवसाचा दिवस केवळ कौटुंबिक स्वरूपात न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
रुग्णालयात अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले. रुग्णांच्या उपचारासोबतच त्यांची काळजी घेणे, त्यांना मानसिक धीर देणे आणि कठीण प्रसंगी माणुसकीची साथ देणे हे आरोग्यसेवेचे महत्त्वाचे अंग असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम, ज्येष्ठ पत्रकार सुनील भाऊ वानखडे, पत्रकार दिनेश डोंगरदिवे, पत्रकार गजानन तायडे, पत्रकार रवी चव्हाण, पत्रकार सतीश मनवर, पत्रकार प्रफुल्ल भटकर, पत्रकार अनिल डाहेलकर, निलेश सरदार, अन्नपूर्णा इंगळे, सुजाता वानखडे तसेच साहित्यिक पत्रकार व मिलिंद अवचित इंगळे यांच्यासह कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ आणि जनग्रामिण पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
वाढदिवस, जयंती किंवा स्मृतिदिन हे केवळ शुभेच्छा आणि औपचारिक कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविल्यास त्या दिवसाला अधिक अर्थ प्राप्त होतो. याच विचारातून रुग्णांना फळवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असून, या उपक्रमातून ‘माणुसकीची सेवा हीच खरी समाजसेवा’ हा संदेश देण्यात आला.








