शिर्डी पोलिसांची दमदार कारवाई; १८ लाख ३४ हजारांचे ५५ मोबाईल जप्त…
बातमी सम्राट
राहता प्रतिनिधि रोहित जोशी
शिर्डी,(प्रतिनिधी):- शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. शिर्डीतील दत्तनगर परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नामांकित कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत सुमारे १८ लाख ३४ हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री वरिष्ठांच्या आदेशानुसार शिर्डी पोलीस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी दत्तनगर, शिर्डी येथे झारखंड येथून काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आलेल्या काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक संबंधित ठिकाणी पोहोचले. त्यावेळी घरातील दोन इसम मागील दरवाजातून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये नामांकित कंपन्यांचे एकूण ५५ मोबाईल फोन, असा एकूण १८ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी मुद्देमालाचा पंचनामा करून याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. ८६१/२०२६ दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ व १२४ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१४३२ संतोष लांडे करीत आहेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या घटनांशी संबंधित आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.








